शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनास तयार राहा Pink bollworm management on cotton

 कपाशीवर डोमकळी दिसताच गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनास तयार राहा


जूनच्या पहिल्या पंढरवाडयात कपाशीची लागवड केलेल्या काही ठिकाणी सध्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे कपाशीला फुले लागण्यास सुरुवात झाल्यापासुन सर्व शेतकऱ्यांनी शेताचे नियमित निरिक्षण करणे आवश्यक आहे. गुलाबी बोंडअळीग्रस्त डोमकळ्या दिसून येताच  ताबडतोब व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना करावी.

ओळख

पतंग ८-९ मि.मी .लांब, करड्या तपकिरी रंगाचे असून समोरच्या पंखावर काळ पट्टे असतात. मागील पंख रुपेरी करडी असून कडांना झालर असते.

अंड्यातून निघालेली अळी लहान, मि.मी. लांब, पांढरी असून तिचे डोके तपकिरी असते. पूर्ण वाढलेली अळी ११-१३ मि.मी. लांब, लंबगोलाकार, पांढरी असून प्रत्येक वलयावर गुलाबी पट्टा असतो. हा गुलाबी पट्टा नंतर पूर्ण शरिरावर पसरतो. त्यामुळे पूर्ण शरिर गुलाबी दिसते. नर अळीच्या शरिरातील गडद तपकिरी जननग्रंथी वरच्या बाजूने दिसतात.



नुकसानीचा प्रकार

अंड्यातून निघालेली अळी ताबडतोब पाते, कळ्या, फुले बोंडाना छोटे छिद्र करुन आत शिरते. सुरुवातीला अळ्या पाते, कळ्या, फुलांवर उपजिवीका करतात. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. अशा कळ्यांना  डोमकळ्या म्हणतात. प्रादुर्भावग्रस्त पाते, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व होताच फुटतात गळून गेलेली बोंडे सडतात. बोंडामध्ये एकदा का ही अळी शिरली की तिची विष्ठा बोंडाचे बारीक कण यांच्या साहाय्याने ही छिद्रे बंद करते. त्यामुळे बोंडावर या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. अळी बोंडातील बिया खाते. एक अळी १-५ बिया खाते. त्याचबरोबर अळी रुई कातरुन नुकसान करते. त्यामुळे रुई सडते खराब होते. प्रादुर्भावग्रस्त बोंडाची वाढ खुंटते, बोंडे पूर्णपणे फुटत नाहीत. अळी बोंडातील बिया खाते एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात शिरते. त्यामुळे रुईची प्रत खालावते. त्याचबरोबर सरकीतील तेलाचे प्रमाण कमी होते. अळी कपाशीच्या ते बिया एकत्र जोडून त्यात कोषावस्थेत जाते. अशा बियांना जोडबीज म्हणतात. सरकी किडल्यामूळे बियाण्याच्या उगवणीचे प्रमाण खूप कमी होते. या किडीच्या अळ्या जिनींग मिल, कोठारात सरकीत आढळतात.



 

लागवडीनंतरचे व्यवस्थापन

  • पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे.
  • कामगंध सापळे : लागवडीच्या ४५ दिवसानंतर सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ सापळे याप्रमाणे लावावेत. सामूहिकरीत्या पतंग गोळा करण्यासाठी हेक्टरी २० सापळे लावावेत.


  • जैविक कीटकनाशकाचा वापर :
  • ५ % निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टिन १५०० पीपीएम ५० मिली १० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
  • बिव्हेरिया बॅसियाना १.५ % विद्राव्य घटक असलेली भुकटी ४० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
  • ट्रायकोकार्ड : ट्रायकोग्रामाटॉयडी बॅक्ट्री या परोपजिवी गांधीलमाशीने परोपजीवीग्रस्त १.५ लाख अंडी / हेक्टर याप्रमाणात पीक ५०-६० दिवसाचे झाल्यानंतर दोन वेळा वापरावे.

आर्थिक नुकसानीची संकेत पातळी : ८ पतंग / सापळा / दिवस सलग तीन दिवस किंवा १ अळी / १० फुले किंवा १ अळी / १० बोंडे ओलांडल्यास शिफारस केलेल्या रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा.

शिफारस केलेली कीटकनाशके

कीटकनाशके

प्रमाण / १० लि. पाणी

प्रोफेनोफॉस ५० ईसी किंवा

३० मिली

थायोडीकार्ब ७५ % डब्ल्युपी किंवा

२० ग्रॅम

लॅम्बडा साहॅलोथ्रीन ५ ईसी किंवा

६ मिली

सायपरमेथ्रीन २५ ईसी किंवा

४ मिली

फेनवलरेट २० ईसी किंवा

८ मिली

प्रोफेनोफॉस ४० टक्के + सापरमेथ्रीन ४ टक्के ईसी किंवा

१० मिली

थायामिथाक्झाम १२.६ + लॅम्बडा साहॅलोथ्रीन ९.५  झेडसी किंवा

४ मिली

क्लोरॅनट्रानीलिप्रोल ९.३ + लॅम्बडा साहॅलोथ्रीन ४.६ झेडसी किंवा

४ मिली

पायरिप्रॉक्झीफ़ेन ५ + फ़ेनप्रोपॅथ्रीन १५ ईसी

१० मिली

विशेष सूचना

  • रील प्रमाण साध्या पंपासाठी आहे. पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे.
  • लागोपाठ एकाच किटकनाशकाची फ़वारणी करु नये.
  • पायरेथ्रॉईड गटातील किटकनाशकाची (लॅमडा साहॅलोथ्रीन, फेनवलरेट, सायपरमेथ्रीन) फवारणी नोव्हेंबर महिन्याअगोदर करु नये. यामुळे पांढऱ्या माशीचा उद्रेक होतो.
  • एकापेक्षा जास्त कीटकनाशक फवारणी पंपात मिसळून वापरू नये.
  • गुलाबी बोंडअळीसोबत रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव असेल तरच शिफारस केलेली मिश्र कीटकनाशके वापरावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पैसा / वाणू  (मिलिपीड) व्यवस्थापन