बुधवार, १० एप्रिल, २०१९


सुप्तावस्थेतील गुलाबी बोंडअळी : पुढील हंगामातील प्रादुर्भावाचे स्त्रोत


      गुलाबी बोडअळीमुळे मागील तीन-चार वर्षापासून कपाशीच्या उत्पादनात घट येत असून उत्पादन खर्चदेखील वाढला आहे. ही कीड बोडाच्या आत असल्यामुळे सहजासहजी नियत्रणात येत नाही. तसेच अळि अवस्था सुप्तावस्थेत राहून पुढील हगामातील प्रादुर्भावाचे स्त्रोत बनते. त्यामुळे गुलाबी बोडअळीचे जीवनक्रम व तिच्या सुप्तावस्थेची माहिती असणे आवश्यक आहे.

सुप्तावस्था म्हणजे काय?
  • कीटक निसर्गातील नियमितपणे वारंवार येणाऱ्या प्रतिकुल हवामानावर मात करण्यासाठी त्यांची वाढ लांबणीवर टाकतात आणि निष्क्रीय राहतात, यास सुप्तावस्था असे म्हणतात.
  • सुप्तावस्था ही कीटकाच्या जीवनक्रमातील ठराविक अवस्थेत अनुवांशिकरित्या आढळून येते.

सुप्तावस्थेतील कीटकाची कोणती लक्षणे आढळतात?
  • चयापचय क्रिया कमी होते.
  • किंचित किंवा काहीच वाढ होत नाही.
  • अति कमाल किंवा किमान हवामानास प्रतिकारक्षम होतात.
  • वागणूकीत बदल होऊन ते निष्क्रीय राहतात.

कीटक कोणकोणत्या अवस्थेत सुप्तावस्थेत जातात?
  • वेगवेगळे कीटक वेगवेगळ्या अवस्थेत सुप्तावस्थेत जातात.
  • नाकतोडे अंडी अवस्थेत, गुलाबी बोडअळी व खोडकिडा अळी अवस्थेत, काही पतंगवर्गीय किडी कोष अवस्थेत आणि हुमणी प्रौढ अवस्थेत सुप्तावस्थेमध्ये जातात.
  • काही कीटकाचा वर्षभरात एकच जीवनक्रम पूर्ण होतो, से कीटक कोणत्यातरी एका अवस्थेत सुप्तावस्थेत जातात. उदा. नाकतोडयाचा वर्षभरात एकच जीवनक्रम पूर्ण होतो आणि ते अंडी अवस्थेत सुप्तावस्थेत जातात.
  • काही कीटकांचे वर्षभरात अनेक जीवनक्रम पूर्ण होतात. अशा कीटकामध्ये एका जीवनक्रमात कोणत्यातरी एका अवस्थेत सुप्तावस्थेत जाते. उदा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे वर्षभरात अनेक जीवनक्रम होतात. हिवाळयाच्या सुरुवातीपासूनच्या जीवनक्रमात काही अळया सुप्तावस्थेत जातात.

कपाशीवरल गुलाबी बोंडअळी कशाप्रकारे सुप्तावस्थेत जाते?
  • कपाशीवरील गुलाबी बोंडअळी ही अळी अवस्थेत सुप्तावस्थेत जाते.
  • अळी स्वत:भोवती रेशमी धाग्याचे आवरण रुन त्यात सुप्तावस्थेत जाते.
  • जमिनीवर पडलेल्या पालापाचोळा किंवा, झाडावर वेचलेल्या बोंडामध्ये आणि सुत गिरण्यामध्ये साठविलेल्या कपाशीमध्ये भेगामध्ये सुप्तावस्थेतील अळया आढळून येतात.
  • अळी बोंडातील बियाच्या आतील भाग खाऊन शिल्लक राहिलेल्या टरफलामध्ये सुप्तावस्थेत जाते.

गुलाबी बोंडअळीच्या सुप्तावस्थेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत?
गुलाबी बोंडअळीच्या सुप्तावस्थेवर दिवस रात्रीचा कालावधी, तापमान आणि खाद्य हे घटक परिणाम करतात.
  • दिवस रात्रीचा कालावधी : कमी कालावधीचा दिवस आणि जास्त कालावधीची रात्र यानुसार गुलाबी बोंडअळी सुप्तावस्थेत जाते. कमी कलावधीच्या दिवसाच्या प्रमाणानुसार अळीचे सुप्तावस्थेतचे प्रमाण वाढत जाते.
  • तापमान : कमी होणाऱ्या तापमानानुसार गुलाबी बोंडअळीचे सुप्तावस्थेत जाण्याचे प्रमाण बदलते.
  • खाद्य : जवळपास पक्व होणाऱ्या बोंडामध्ये अळी सुप्तावस्थेत जाते.
      सर्वसाधारणपणे जेव्हा दिवसाचा कालावधी कमी होतो तापमान कमी होते, त्यानुसार अळयाचे सुप्तावस्थेत जाण्याचे प्रमाण वाढते. महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरडिसेंबर यानंतरच्या कालावधीत अशी परिस्थिती असते.

गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम कशाप्रकारे पूर्ण होतो?
कोषातून पतंगाची उत्पत्ती झाल्यानंतर २-३ दिवसांनी नर मादीचे मिलन होते. मादी पतंग पहिल्या पिढीची अंडी ही कपाशी कायिक वाढीच्या अवस्थेत असतांना पात्याजवळ किंवा पात्यावर घालते. दुसऱ्या त्यानंतरच्या पिढीची अंडी बोंडावर घालते. अंडी एकएकटी किंवा ४-५ च्या समुहात असतात. एक मादी १०० पेक्षा जास्त अंडी घालते. अंडी अवस्था ३-७ दिवसांची असते. अंड्यातून निघालेली अळी ताबडतोब पाते, फुले किंवा बोंडामध्ये शिरते. अळी तीन वेळा कात टाकते. अळीचे दोन प्रकारचे जीवनक्रम असतात.
  • कमी कालावधीचा जीवनक्रम (पूर्ण वाढलेली अळी कोषावस्थेत जाते त्यातून ताबडतोब पतंग बाहेर पडून पुढील जीवनक्रम होतो): कमी कालावधीचा जीवनक्रम असलेल्या अळ्या बोंडाला छिद्र करुन बाहेर निघून जमिनीवर पालापाचोळ्यात कोषावस्थेत जातात किंवा पूर्ण वाढलेली अळी बोंडाला छिद्र करते बोंडामध्ये कोषावस्थेत जाते. अळी अवस्था ८-२१ दिवस असते. कोषावस्था ६-२० दिवस असते. कोषावस्थेतून पतंग बाहेर पडतात. साधारणपणे नर-मादीचे प्रमाण १:१ असते. पतंग ५-३१ दिवस जगतात.
  • दीर्घ कालावधीचा जीवनक्रम (पूर्ण वाढलेली अळी सुप्त अवस्थेत राहते): दीर्घ कालावधीचा जीवनक्रम असलेल्या अळ्या स्वत:भोवती गोलाकार कोष विणून त्यात सुप्तावस्थेत राहतात. ही सुप्तावस्था पुढील हंगामापर्यंत किंवा दोन वर्षे देखील राहते. हा दीर्घ कालावधीचा जीवनक्रम हंगामाच्या शेवटी आढळून येतो.
कमी कालावधीचा जीवनक्रम ३-४ आठवड्यात आणि दीर्घ कालावधीचा एक जीवनक्रम ५-१० महिन्यात पूर्ण होतो. वर्षभरात ४-६ पिढ्यांची उत्पत्ती होते.

कपाशीच्या हंगाममध्ये गुलाबी बोंडअळीचे सुप्तावस्थेत जाण्याचे प्रमाण कसे असते?
  • गुलाबी बोंडअळीच्या सुरुवातीच्या म्हणजेच नोव्हेबर महिन्याच्या अगोदरच्या ज्या पिढया तयार होतात, त्यामध्ये अळया सुप्तावस्थेत जात असल्याचे आढळून आले नाही.
  • नोव्हेंबरडिसेंबर मध्ये कमी कालावधीचा दिवस यासोबत कमी तापमान कोवळया बोंडाची ख्या कमी झाल्यावर गुलाबी बोंडअळी सुप्तावस्थेत जाण्याला सुरुवात होते.
  • या जीवनक्रमात काही अळया सुप्तावस्थेत जातात, तर शिल्लक राहिलेल्या अळया कोषात जातात आणि त्यातून पतंग बाहेर पडून पुढील पिढी तयार होते.
  • यानंतरच्या जीवनक्रमातील अळयांचे सुप्तावस्थेत जाण्याचे प्रमाण हळूहळू वाढते.
  • हंगामाच्या शेवटी शेतात शिल्लक राहिलेल्या बोंडामध्ये आणि जिनिंग मिलमध्ये साठविलेल्या कापसामध्ये सर्व अळया सुप्तावस्थेत जातात.

गुलाबी बोंडअळीची सुप्तावस्था किती कालावधीची असते?
  • सुप्तावस्थेत गेलेली बोंडअळी प्रामुख्याने पुढील हंगामामध्ये पावसाळयामध्ये कोषात जाऊन त्यातून पतंग बाहेर पडतात आणि नवीन लावगड केलेल्या कपाशीवर अंडी घालतात.
  • ज्या ठिकाणी शेतामध्ये पऱ्हाटी लवकर काढली नाही आणि जिनिंग मिलजवळील शेतामध्ये नविन लागवड केलेल्या कपाशीवर पहिल्यांदा प्रादुर्भाव आढळून येतो.
  • सुप्तावस्थेतून बाहेर येण्यासाठी जास्त आर्द्रता असावी लागते.
  • गुलाबी बोंडअळीची सुप्तावस्था ६-८ महिन्याची सर्वसाधारणपणे असते. परंतु हा कालावधी अडीच वर्षापर्यंत आढळून आल्याची नोंद आहे.

गुलाबी बोंडअळीची सुप्तावस्था लक्षात घेता तिचे व्यवस्थापन कसे करावे?
गुलाबी बोंडअळीचे आपल्या भागामध्ये कापूस हेच प्रमुख खाद्य पीक आहे. तिच्या सुप्तावस्थेत जाण्याचा कालावधी आणि नंतरच्या हंगामातील नवीन कपाशीच्या लावगडीवरील प्रादुर्भाव या वेळा नोंद करुन विविध उपाययोजना केल्यास गुलाबी बोंडअळीचे शाश्वत व्यवस्थापन होईल.
  • फरदरड घेऊ नये : फरदड घेतल्यास शेंडयाकडे बोंडे लागतात. ही बोंडे लहान असून यामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. त्यामुळे फरदड घेतलेल्या कपाशीपासून कमी निकृष्ट दर्जाचे उत्पादन येते. तसेच बोंडअळीचा जीवनक्रम चालू राहतो आणि पुढील हंगामामध्ये जास्त प्रमाणा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.
  • हंगामाच्या शेवटी झाडावर शिल्लक राहिलेल्या खाली पडलेल्या बोंडामध्ये सुप्तावस्थेतील अळया असतात. हंगाम संपल्यावर शेतातील पऱ्हाटी काढून पुढील हंगामाअगोदर विल्हेवाट  लावावी. तसेच जमिनीवर पडलेले किडकी बोंडे पिकाचे अवशेष वेचून नष्ट करावी. यामध्ये सुप्तावस्थेतील ळ्यापासून पुढील हंगामामध्ये होणारे प्रादुर्भाव -याच प्रमाणात कमी करता येईल.
  • उन्हाळयात जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीच्या आतील भेंगामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या अळया प्रखर सुर्यप्रकाशाने मरतील किंवा पक्षी वेचून त्यांना खातील.
  • कपाशीवर जिनिंग मिलमध्ये पुढील हंगाम सुरु होण्याअगोदर प्रक्रिया करावी. जर प्रक्रिया करण्यास उशीर होणार असेल तर धुरीजन्य कीटकनाशकाची प्रक्रिया करावी. किडलेल्या सरकीची विल्हेवाट लावावी.
  • कपाशीची वेचणी झाल्यावर जेथे कापूस साठवून ठेवला आहे तिथे कामगंध सापळे लावून नर पतंग सामुहीकरीत्या आकर्षित करुन ते नष्ट करावेत.
  • पुर्व हंगामी कपाशीची लागवड टाळावी. यामुळे पाऊस पडल्यानंतर पहिल्यांदा जे पतंग बाहेर निघतात त्यावेळी पिकाची अवस्था लहान असल्यास ते त्यावर अंडी घालत नाहीत किंवा घातली तरी त्यातू निघणाऱ्या अळा खाद्य नसल्यामुळे जगणार नाहीत.
  • कामगंध सापळयाचा वापर करावा. नवीन लागवड केलेल्या कपाशीमध्ये कामगंध सापळे लावावेत. यामुळे गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाची सुरुवात कळू शकते. त्याचबरोबर जास्त प्रमाणात कामगंध सापळे लावल्यास अधिक संख्येने नर पतंग आकर्षित करुन त्यांचा नायनाट करता येतेा.
  • मादी पतंग कोषातून निघाल्यानंतर १० दिवसाच्या आत जवळपास सगळी अंडी घालते. कामगंध सापळयातील पतंगाच्या नोंदी लक्षात घेऊन त्यानंतर आठवडयामध्ये रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.

      गुलाबी बोडअळीचा जीवनक्रम लक्षात घेता शेतकरी बाधवानी फ़रदड घेऊ नये आणि पिकाच्या अवशेषाची पुढील हगामाअगोदर विल्हेवाट लावावी. तरच पुढील वर्षीच्या हगामात कपाशीवरील गुलाबी बोडअळीचे यशस्वीरित्या व्यवस्थापन होईल.


पैसा / वाणू  (मिलिपीड) व्यवस्थापन