शनिवार, १७ जुलै, २०२१

शंखी गोगलगाय - एक बहुभक्षी हानीकारक मृदुकाय प्राणी Snail Management

 शंखी गोगलगाय - एक बहुभक्षी हानीकारक मृदुकाय प्राणी



           गोगलगाय एक मृदुकाय प्राणी आहे. ही जमिनीवर आढळणारी पिकांना सर्वात जास्त नुकसानकारक गोगलगाय म्हणून ओळखली जाते. सध्या या गोगलगायीचा प्रादुर्भाव परभणी जिल्हयातील जाम, पारवा या गावामध्ये आढळून आला आहे. ही गोगलगाय कपाशीचे बियाणे फस्त करून फक्त टरफल शिल्लक ठेवत आहे. त्यामुळे कपाशीची उगवण होत नाही व मोठया प्रमाणात शेतामध्ये तूट दिसून येत आहे. त्याचबरोबर तूट लावल्या जागेवरचे बियाणेसुध्दा खाऊन टाकत आहेत. तसेच बांधावरील व शेतावरील तणावरसुध्दा खाताना गोगलगायी आढळून आल्या आहेत.

          आपल्याकडे अचॅटिना फ्युलिका ही शंखी गोगलगायाची प्रजाती पिकांना हानीकारक आहे. भारतामध्ये सर्वप्रथम 1946-47 मध्ये ओरिसा राज्यामध्ये या गोगलगायाची नोंद झाली आहे. 1979 मध्ये बंगलोरमध्ये शोभिवंत झाडे व भाजीपाला पिकावर या गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून आला होता. आता संपूर्ण भारतामध्ये सर्व राज्यात हिचा प्रसार झाला आहे. ही तृणधान्ये, नगदी पिके, भाजीपाला, फळपिके आणि शोभिवंत झाडे यांना नुकसान पोहचविते.

जीवनक्रम

शंखी गोगलगायीच्या अचॅटिना फ्युलिका या प्रजातीमध्ये एकाच गोगलगायीमध्ये नर व मादीची अवयवे असतात. पण प्रजननासाठी दोन गोगलगायीचे मिलन होणे गरजेचे असते. जर एकाच आकाराच्या दोन गोगलगायीचे मिलन झाल्यास दोन्ही गोगलगायी अंडी देतात. जर एक मोठी आणि दुसरी लहान गोगलगाय यांचे मिलन झाल्यास फक्त मोठी गोगलगाय अंडी देते. अंडी ही ओलसर जमिनीमध्ये पुंजक्यात दिली जातात. एका पुंजक्यात साधारपणे 200 अंडी असतात.  एक गोगलगाय अंडीची 5-6 पुंजके एका वर्षात घालते. अंडी पांढरट साबुदाण्यासारखी असतात.  अंडयातून एक दोन आठवडयातून लहान गोगलगायी बाहेर निघतात व त्यांचे 6 महिन्यामध्ये प्रौढात रूपांतर होते. सर्वसाधारपणे या गोगलगायी 5 ते 6 वर्ष जीवंत राहतात. प्रतिकुल वातावरणात या गोगलगायी तीन वर्षापर्यंत जमिनीमध्ये सुप्तावस्थेमध्ये राहू शकतात.

 नुकसानीचा प्रकार

  • शंखी गोगलगाय सर्व प्रकारची पिके तृणधान्ये, भाजीपाला, फळपिके व शोभिवंत झाडांना नुकसान पोहचविते.
  • कपाशीमध्ये लागवड केलेली बियाणे तसेच तूट भरुन काढण्यासाठी लावलेली बियाणे खाऊन फक्त टरकल शिल्लक ठेवतात. त्यामुळे शेतामध्ये तूट मोठया प्रमाणात आढळून येते.
  • तसेच रोपावस्थेत पानासहित संपूर्ण रोप खाऊन टाकतात.
  • या गोगलगायी निशाचर असून फक्त रात्रीच्या वेळीच पिकांना नुकसान करतात. दिवसा त्या जमिनीमध्ये किंवा बांधावर लपून राहतात.

 


गोगलगायीचा प्रसार

  • शेतातील वापरात असलेली अवजारे, ट्रॅक्टर, यंत्रसामग्री, जनावरे, वाहने यामार्फत होतो.
  • रोपे, कुंडया, बेणे इत्यादी मार्फत सुध्दा प्रसार होतो.

 व्यवस्थापन

  • संध्याकाळी बाहेर निघालेल्या आणि दिवसा शेतात व बांधावरील गोगलगायी हाताने वेचून त्या साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा खोल खड्डा करून जमिनीमध्ये गाडून टाकाव्यात.
  • शेत तणविरहित ठेवावेत. शेतातील तसेच बांधावरील तणाचे व्यवस्थापन करावे.
  • पिकामध्ये कोळपणी करावी. त्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या गोगलगायी उघडया पडून नष्ट होतील.
  • गोणपाट किंवा गवताचे ढीग गुळाच्या पाण्यामध्ये बुडवुन संध्याकाळी शेतामध्ये जागोजागी ठेवावेत.  दुस­या दिवशी सकाळी यावर आकर्षित झालेल्या गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात.
  • शेतातील मुख्य पिकावर प्रादुर्भाव टाळण्यासाठी कडेने चुन्याची भुकटी किंवा तंबाखुची भुकटी टाकावी. परंतु पाऊस पडल्यास याचा उपयोग होत नाही.
  • शेतातील अवजारे, साहित्य दुस­या जागी घेऊन जाताना स्वच्छ करून घेऊन जावे. जेणेकरून त्यासोबत गोगलगायीचा प्रसार होऊ नये.
  • मेटाल्डीहाईड या रसायनाचा २ कि.ग्रॅ./एकर वापर करावा.



          वरील सर्व उपाययोजना गावपातळीवर सामुहिकरित्या केल्यासच या शंखी गोगलगायीचे व्यवस्थापन होईल व आपल्या पिकांचे होणारे नुकसान वाचेल.

पैसा / वाणू  (मिलिपीड) व्यवस्थापन