शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

कपाशीवरील फुलकिड्याचे तात्काळ व्यवस्थापन करा Management of Thrips on Cotton

 कपाशीवरील फुलकिड्याचे तात्काळ व्यवस्थापन करा      

          सध्या कपाशीवर फुलकिडे या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीस सध्याचे वातावरण अतिशय पोषक आहे, त्यामुळे या किडीची संख्या कमी कालावधीत झपाट्याने वाढते. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी कपाशीवरील या किडीच्या व्यवस्थापनासाठी तात्काळ उपाययोजना करावी.

ओळख : फुलकिडे अतिशय लहान व नाजूक असून ते १ मि.मी.पेक्षा कमी लांब असून रंगाने फिकट पिवळसर किंवा तपकिरी रंगाची असतात. सुक्ष्मदर्शक यंत्रातून त्यांची तपासणी केली तर त्यांच्या पंखांच्या कडा केसाळ दिसतात. यांची पिल्ले सुक्ष्म व बिनपंखी असतात.


नुकसानीचा प्रकार : प्रौढ फुलकिडे आणि पिल्ले कापसाच्या पानामागील भाग खरवडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त भागातील पेशी शुष्क होतात व प्रथम तो भाग पांढुरका आणि नंतर तपकिरी होतो. त्यामुळे पाने, फुले व कळया आकसतात, झाडाची वाढ खुटंते. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास पाने व झाड काळपट-तपकिरी दिसतात. कोरडवाहू कपाशीवर या किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवाडयापासून सुरु होतो.  सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाडयात सर्वात जास्त प्रादुर्भाव आढळून येतो.  ही कीड कापसाशिवाय मिरची, द्राक्ष, तोंडली, दुधी भोपळा, पेरु इत्यादी पिकांनासुध्दा उपद्रव करते.


जीवनक्रम : पूर्ण वाढ झालेली फुलकिडयाची मादी पानाच्या पेशीत अंडी देते. सर्वसाधारणपणे ही अंडी पानाच्या मागच्या भागात असतात. एक मादी ३० ते ४० अंडी देते. अंडी आकाराने खूप लहान असतात. २ ते ५ दिवसात अंडयातून पिल्ले बाहेर पडतात. पिल्ले ही पांढरट ते फिक्कट पिवळसर रंगाची असतात. पिल्लावस्था ४ ते ६ दिवसांची असते. ती प्रौढ फुलकिडयासारखीच दिसतात पण त्यांना पंख नसतात. पिल्लाची शेवटची अवस्था जवळपास २० तास जमिनीत कोषावस्थेप्रमाणे निश्चल राहते. पिल्ले तीन वेळा कात टाकून ५ ते ६ दिवसात प्रौढ अवस्थेत पोहोचतात. पूर्ण वाढ झालेला फुलकिडा १० ते १५ दिवस जगतो. किडीच्या वर्षामध्ये ३ ते ४ पिढया पूर्ण होतात.

आर्थिक नुकसानीची संकेत पातळी : १० फुलकिडे / पान

व्यवस्थापन

  • लागवड योग्य अंतरावर करावी. कपाशीचे पीक दाटल्यास फुलकिड्याचा प्रादुर्भाव वाढतो.
  • शिफारशीपेक्षा जास्त नत्रयुक्त रासायनिक खताचा आणि संप्रेरकाचा वापर करू नये.
  • कोळपणी व खुरपणी करावी. यामुळे तणांचा बंदोबस्त होतो, तसेच फुलकिड्याच्या पिल्लाची शेवटची अवस्था जमिनीत कोषावस्थेप्रमाणे निश्चल राहते. ही अवस्था कोळपणी व खुरपणी केल्यामुळे नष्ट होते.
  • रासायनिक कीटकनाशकासोबत विद्राव्य खते, संप्रेरके, एकापेक्षा जास्त कीटकनाशके यांचे मिश्रण करू नये.

शिफारस केलेली कीटकनाशके

कीटकनाशक

प्रमाण / १० लि. पाणी

फ्लोनीकॅमीड ५० डब्ल्युजी किंवा

३ ग्रॅम

स्पायनेटोरम ११.७ एससी किंवा

८ मिली

बुप्रोफेझीन २५ एससी किंवा

२० मिली

डायफेन्थुरॉन ५० डब्ल्युपी किंवा

१२ ग्रॅम

फिप्रोनील एससी किंवा

३० मिली

फिप्रोनील १८.८७ एससी किंवा

७.५ मिली

डायनोटेफ्युरॉन २० एसजी

३ ग्रॅम


विशेष सूचना

  • पेट्रोल पंपासाठी वरील प्रमाण तीनपट करावे. 
  • फवारणी करताना सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी.
  • एका वेळी एकाच कीटकनाशकाची फवारणी करावी.
  • गरजेनुसार कीटकनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी.

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पैसा / वाणू  (मिलिपीड) व्यवस्थापन