सोमवार, १६ डिसेंबर, २०१९


रबी ज्वारी व गव्हावरील खोडमाशीचे व्यवस्थापन


      रबी हगामातील ज्वारी व गहू पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. ही कीड महत्वाची व गंभीर असून वेळीच उपाययोजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
ओळख : ही कीड घरमाशीप्रमाणे परंतु आकाराने लहान असते. खोडमाशी रंगाने काळपट राखाडी रंगाची असून तिच्या पृष्ठभागावर खालच्या बाजूने ४ ते ५ ठिपके असतात. अंडी पाढरी, चपटी व लांबट आकाराची असतात. पूर्ण वाढ झालेली अळी १० ते १२ मि.मी. लांबीची असून ती तोंडाकडे निमुळती असते. तिचा रंग पिवळसर असतो व तिला पाय नसतात. कोष तपकिरी रगाचे असतात.

अळी

अंडी

नुकसानीचा प्रकार : हया किडीचा प्रादुर्भाव फक्त रोपावस्थेतच आढळून येतो. अंडयातून निघालेली अळी रोपाच्या बुडापर्यंत जाऊन खोडाला छिद्र पाडते व आत शिरुन वाढणा­या पोंग्यावर उपजिवीका करते. त्यामुळे सुरुवातीला मधला वाढणारा रोपाचा भाग पिवळसर पडणे व नंतर तो मरून जातो यालाच पोंगेमर असे म्हणतात. लहान रोपे या किडीच्या प्रादुर्भावामुळे पूर्णत: मरून जातात तर मोठया रोपांना बाजूने फुटवे फुटून उत्पादनात घट येते. हया किडीचा प्रादुर्भाव उशिरा पेरणी झालेल्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळून येतो तर ढगाळ वातावरणामुळे बागायती क्षेत्रात हया किडीची वाढ छपाटयाने झालेली आढळून येते. ज्वारी, बाजरी, मका, गहू व इतर तृणधान्ये तसेच काही तृणवर्गीय गवतावर ही कीड उपजिवीका करते.



जीवनक्रम : हया किडीच्या अंडी, अळी, कोष व प्रौढ माशी अशा एकूण चार अवस्था असतात.  प्रौढ मादी माशी तिच्या एक महिन्याच्या जिवनक्रमात पानाच्या खालच्या बाजूस किंवा लहान रोपाच्या नवीन खोडावर एकएकटी अशी एकूण ४० ते ५० अंडी घालते. २ ते ३ दिवसांनी अंडयातून पांढुरक्या रंगाची अळी बाहेर पडते व ती तिचा १० ते १२ दिवसांचा जीवनक्रम खोडाच्या आत उपजिवीका करून पूर्ण करते व अशी पूर्ण वाढ झालेली अळी खोडामध्ये किंवा खोडाबाहेर येऊन जमिनीत कोषावस्थेत जाते. कोषावस्था एक आठवडयाची असते. एक आठवडयांनी कोषातून प्रौढ माशी बाहेर पडते व मिलनानंतर ती अंडे द्यायला सुरुवात करते. अशाप्रकारे एक माशी तिची एक पिढी एकूण २ ते ३ आठवडयात पूर्ण करते व अशा कित्येक पिढया एका वर्षात तयार होतात. या किडीमध्ये अळी व कोष हया सुप्तावस्था असतात, त्या कडब्यामध्ये आढळून येतात.


एकात्मिक कीड व्यवस्थापन
  • पिकाची कापणी झाल्यावर शेताची नांगरणी करून व त्यातील धसकटे गोळा करुन नष्ट करावीत म्हणजे त्यामधील सुप्तावस्थेतील अळयांचा नाश होईल.
  • पेरणी वेळेवर करावी, पेरणीस उशिर झाल्यास बियाण्याचे प्रमाण वाढवावे.
  • पिकाची फ़ेरपालट करावी.
  • कोळ्पणी व खुरपणी वेळेवर करावी, त्यामुळे जमिनीतील कोष नष्ट होतील.
  • ५ % निंबोळी अर्काची फ़वारणी करावी.
  • ज्वारीवरील शिफ़ारस केलेली कीटकनाशके
  • इमिडाक्लोप्रीड  ७० ड्ब्ल्युएस १० मिली किंवा इमिडाक्लोप्रीड  ४८ एफ़एस १२ मिली किंवा इमिडाक्लोप्रीड  ७० ड्ब्ल्युएस १० मिली किंवा थायामिथॉक्झाम ३० एफ़एस १० मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
  • क्विनालफॉस २५ ईसी ३० मिली किंवाक्झीडीमेटॉन मिथाईल २५ ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फ़वारावे.
  • गव्हावरील शिफ़ारस केलेली कीटकनाशके
  • सायपरमेथ्रिन १० ईसी ११ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फ़वारावे. किंवा
  • जमिनीत ओल असल्यास फ़ोरेट १० सीजी हे दाणेदार कीटकनाशक १८.७५ किलो/हे. जमिनीत मिसळावे.

      अशाप्रकारे वेळेवर योग्य उपाययोजना केल्यास खोडमाशीचे चागल्याप्रकारे व्यवस्थापन होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पैसा / वाणू  (मिलिपीड) व्यवस्थापन