शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

सोयाबीन

सोयाबीनवरील प्रमुख किडी
  • तंबाखुवरील पाने खाणारी अळी
  • उंटअळी
  • घाटेअळी
  • पाने पोखरणारी अळी
  • चक्री भुंगा
  • खोडमाशी

तंबाखुवरील पाने खाणारी अळी
      या किडीचा पतंग मध्यम आकाराचा असून पुढचे पंख तपकिरी रंगाचे असतात व त्यावर फिकट पिवळसर चट्टे व रेषा असतात. मादी पतंग रात्रीच्या वेळी पानाच्या खालच्या बाजूस शिरेजवळ पुंजक्याने अंडी घालते. लहान अळया सुरवातीस समुहाने राहतात व पानाच्या खालचा भाग खरवडून खातात. मोठया अळ्या ( साधारणपणे तिस­या व त्यापुढील अवस्था) विखरुन एकएकटया पाने खातात. पूर्ण वाढलेली अळी गडद तपकिरी किंवा हिरवट पांढ­या रंगाची असून तिच्या शरिरावर फिकट पाच रेषा असतात. एक रेष पाठीवर मध्यभागी व शरिराच्या दोन्ही बाजूस दोन-दोन रेषा असतात. तसेच शरिराच्या दोन्ही बाजूने प्रत्येक वलयावर काळा ठिपका व त्याच्या वरच्या बाजूस त्रिकोणी ठिपका असतो. मोठया अळया  पानावर मोठे छिद्र पाडून खातात. जर प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर असेल तर झाडाची पूर्ण पाने खाल्लेली व फक्त शिराच शिल्लक राहिलेली दिसतात. फुले व शेंगा लागल्यानंतर या अळया ते सुध्दा खातात. त्यामुळे सोयाबीनचे मोठया प्रमाणात नुकसान हेाते. या किडीचा पतंग व अळया दिवसा सूर्यप्रकाशाच्या वेळी जमिनीमध्ये, पानाखाली लपून राहतात.

उंटअळी      
सोयाबीनवर विविध प्रकरच्या उंटअळया आढळून येतात. प्रामुख्याने जेसूनिया , क्रायसोडेक्सीस व अकाया जनाटा या प्रजाती आढळून येतात. जेसूनिया प्रजातीचा पंतग आकराने लहान व त्याचे पुढील पंख मळकट पिवळसर असतात. अळी नाजुक फिकट हिरव्या रंगाची व सडपातळ शरिराची असते. तिला स्पर्श केल्यास चटकन खाली पडते. क्रायसोडेक्सीस प्रजातीच्या पंतगाचे पुढील पंख तपकिरी करडया रंगाचे व त्यावर चमकदार झाक असते. तर मागील पंख फिकट रंगाचे असतात. समोरच्या प्रत्येक पंखावर चमकदार चांदीसारखे दोन छिपके असतात. त्याचा आकर साधरणपणे इंग्रजी 8 अक्षरासारखा असतो. अळीचे शरिर डोक्याकडे निमुळते होत गेलेले असते. अळीचा रंग फिकट हिरवा असून शरिरावर मध्यभागी निळसर हिरवी रेषा असते व रेषेच्या कडा पांढ­या असतात. अळीच्या शरिराच्या दोन्ही बाजूस फिकट पिवळी रेषा असते. अकाया जनाटा प्रजातीला एरंडीवरील उंटअळी असे म्हणतात. एरंडीवर हिचा खूप मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. याचे पतंग तपकिरी रंगाचे असून पढील पंखावर फिकट व गडद चट्टे असतात. अळी सुरुवातीला काळी आणि नंतर तपकिरी लालसर रंगाची असते. या सर्व ऊंटअळयाच्या लहान अळया पानाचा खालचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे पानाचा फक्त वरचा पांढरा पापुद्रा दिसतो. अळी मोठी झाल्यावर पानांना छिद्र पाडून खाते. मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास झाडाची संपूर्ण पाने खाऊन फक्त शिराच  शिल्लक ठेवतात. याशिवाय फुले व शेंगासुध्दा खातात.


घाटेअळी
      घाटेअळी ही कपाशीवरील अमेरिकन बोंडअळी म्हणून सुध्दा ओळखली जाते. बी टी कपाशीची लागवड व पोषक वातावरणामुळे सध्या घाटेअळी सोयाबीन पिकाला नुकसान पोहचवित आहे. घाटेअळीचा पतंग मजबूत बांध्याचा फिकट पिवळा किंवा बदामी रंगाचा असतो. समोरच्या पंखावर मध्यभागी एक एक काळा ठिपका असतो व कडेच्या बाजूला गडद पट्टा असतो. मादी पतंग कोवळया पानावर अंडी घालते. अंडी घुमटाच्या आकाराची पिवळसर असतात. पहिल्या अवस्थेतील अळी फिकट हिरवी असते व मोठी अळी हिरवट, फिकट पिवळसर, तपकिरी किंवा काळी असते. अळीच्या शरिरावर दोन्ही कडांना तुटक तुटक गर्द करडया रेषा असतात. तसेच अळीच्या शरिरावर थोडे केस असतात. अळी सुरवातीला पाने खाते. कळया, फु ले व शेंगा लागल्यानंतर ही अळी त्यांना नुकसान पोहचविते. अळीने प्रादुर्भावगस्त कळया, फुले व कोवळया शेंगा खाली जमिनीवर पडतात. मोठया शेंगांना अळी गोल छिद्रे पाडून आतील दाणे खाते.



पाने पोखरणारी अळी
      अगोदर भुईमूगावर येणारी  ही कीड सध्या महाराष्ट्र व मध्यप्रदेशामध्ये सोयाबीनवर मोठया प्रमाणात प्रादुर्भाव करत आहे. या किडीचा पतंग लहान, राखाडी रंगाचा असून पुढील पंख मागच्या पंखापेक्षा गडद असतात. पुढच्या पंखाच्या वरच्या कडेला पांढरा चट्टा असतो तर मागच्या पंखाच्या कडा केसाळ असतात. हे पतंग निशाचर असून रात्री प्रकाशाकडे आकर्षित होतात. मादी पतंग पानावर खालच्या किंवा वरच्या बाजूला अंडी घालते. पूर्ण वाढ झालेली अळी मध्यम आकाराची व पाठीमागे निमुळती होत गेलेली असते. अळीचे शरिर हिरवट किंवा तपकिरी व डोके  चमकदार काळया रंगाचे असते. नर अळीच्या पाठीवर गुलाबी रंगाचा ठिपका असतो. सुरवातीला अळी पानाच्या वरच्या बाजूने पान पोखरुन आत शिरते. आठवडाभर आत राहून बाहेर निघते व पानावर कप्पा बनवून त्यात राहते. यानंतर आजूबाजूची पाने एकमेकाला जोडून त्यामध्ये राहून उपजिवीका करते. प्रादुर्भावग्रस्त पाने तपकिरी पडतात व आकसून वाळून जातात. यामुळे झाडाची वाढ खुंटते. तसेच झाडाला शेंगा लहान लागतात व शेंगा भरत नाहीत. प्रादुर्भाव जास्त झालेले पीक जळल्यासारखे दिसते.



चक्री भुंगा
      या किडीचा प्रौढ भुंगा फिकट तपकिरी रंगाचा असतो. त्याचे समोरचे पंख खालच्या बाजूने एक तृतीयांश ते अर्धा भाग काळया रंगाचे असतात. मादी भुंगा पानाचे देठ, खोड यावर दोन खापा करून त्यामध्ये अंडी घालते. लहान अळी पांढ­या रंगाची आणि पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते. अळीच्या डोक्याची मागील बाजू थोडी मोठी असते. अंडयातून अळी निघाल्यानंतर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जाते. त्यामुळे खापेच्या वरील भाग सुकून नंतर वाळतो. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात व त्या पूर्ण भरत नाहीत. तसेच पीक काढणीच्यावेळी खापा केलेल्या जागून खोड तुटून पडते, त्यामुळे देखील नुकसान होते.



खोडमाशी
      प्रौढ माशी आकराने लहान, चकदार काळया रंगाची असते. फक्त पाय, स्पर्शिका व पंखाच्या शिरा फिकट तपकिरी असतात. मादी माशी पानामध्ये वरच्या बाजूस अंडी घालते. अळी पान पोखरुन शिरेपर्यत पोहचून शिरेतून पानाच्या देठामध्ये शिरते. त्यानंतर खोडामध्ये शिरते. अशाप्रकारे अळी आतील भाग खात जमिनीपर्यंत पोहचते. झाड मोठे झाल्यावर वरुन या किडीचा प्रादुर्भाव जाणवत नाही. फक्त जमिनीजवळ खोडातून प्रौढ माशी निघाल्यास खोडाला छिद्र दिसते. त्यामुळे  झाडाच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. फुले व शेंगा कमी लागतात. खोडमाशीचा प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यावर पूर्ण झाड वाळून जाते, त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान होते.
      वरील किडी शिवाय सोयाबीनवर केसाळ अळया, तुडतुडे, पांढरी माशी व शेंगा पोखरणा­या अळीचा प्रादुर्भाव होतो.

एकात्मिक कीड व्यवस्थापन
मशागतीय पध्दती
  • सोयाबीनची लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगरट करावी.
  • मुख्य पिकाभोवती एरंडी आणि सूर्यफुल  या सापळा पिकाची  एक ओळ लावावी आणि त्यावर तंबाखुवरील पाने खाणारी अळी आणि केसाळ अळी यांची प्रादुर्भावग्रस्त पाने अळयासहीत नष्ट करावीत.
  • पेरणी जुलैच्या दुस­या आठवडयापर्यंत संपवावी.
  • सरी वरंबा किंवा पट्टा पध्दतीने लागवड केल्यास किटकनाशकाची फवारणी करणे  सोयीचे होईल.  
  • पिकाच्या सुरुवातीचे अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणा­या किडीच्या पुरक वनस्पतीचा नाश करावा.
  • पिकांची फेरपालट करावी. सोयाबीन पिकांनतर भुईमुगाचे पीक घेऊ नये.

यांत्रिक पध्दती
  • किडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.
  • तंबाखुची पाने खाणारी अळी व केसाळ अळया यांची अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तोडून किडीसह नष्ट करावीत.
  • हिरवी घाटे अळी व तंबाखुची पाने खाणारी अळी या किडीची प्रादुर्भावाची पातळी समजण्याकरीता सर्वेक्षणाकरीता  प्रत्येक किडीसाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे  शेतात लावावेत.
  • शेतात इंग्रजी ‘T’ अक्षरासारखे पक्षीथांबे लावावेत.

जैविक पध्दती
  • तंबाखूवरील पाने खाणा­या (स्पोडोप्टेरा) अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. 500 एल.ई. विषाणू 2 मि.लि. प्रति लिटर पाणी किंवा नोमुरिया रिलाई  या बुरशीची 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी प्रादुर्भाव आढळून येताच करावी.
  • रासायनिक पध्दती
  • ज्याठिकाणी चक्रीभुंगा आणि खेाडमाशीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात येतो अशा ठिकाणी पेरणीचे वेळेस फोरेट 10 टक्के दाणेदार 10 किलो प्रति हेक्टर जमिनीत ओल असताना टाकावे.

फवारणीसाठी किटकनाशके
किडी
कीटकनाशक
प्रमाण / 10 लि. पाणी
पाने खाणा­या अळया
(स्पोडोप्टेरा, उंटअळया, केसाळ अळी, घाटेअळी)
प्रोफेनोफोस 50 ईसी किंवा
20 मिली
क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एससी किंवा
3 मिली
इन्डोक्झाकार्ब 15.8 ईसी किंवा
7 मिली
पाने पोखरणारी अळी
मोनोक्रोटोफॉस 36 एसएल किंवा
8.5 मिली

ट्रायझोफॉस 40 ई.सी.
12 मिली
चक्री भुंगा
ट्रायझोफॉस 40 ई.सी.
12 मिली
क्लोरॅट्रानीलीप्रोल 18.5 एससी किंवा
3 मिली
थायक्लोप्रीड 21.7 एससी किंवा
15 मिली
इथिऑन 50 ईसी
30 मिली
खेाडमाशी
ट्रायझोफॉस 40 ई.सी.
12 मिली
क्लोरॅट्रानीलीप्रोल 18.5 एससी किंवा
3 मिली
इथिऑन 50 ईसी
30 मिली
फोरेट 10 सीजी
15 किलो / हे


                       

1 टिप्पणी: