शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

कापूस

कपाशीवरील प्रमुख किडी
रस शोषणा-या किडी
  • तुडतुडे
  • फुलकिडे
  • पांढरी माशी
  • मावा
  • पिठया ढेकूण
बोंडअळया
  • ठिपक्याची बोंडअळी
  • हिरवी/ अमेरीकन बोंडअळी
  • शेंदरी बोंडअळी
इतर महत्त्वाच्या किडी
  • तांबडे ढेकूण
  • करडे ढेकूण
  • पाने गुंडाळणारी अळी
  • करडे सोंडे कीड
  • तंबाखुवरील पाने खाणारी अळी
  • लाल कोळी


रस शोषणा-या किडी
तुडतुडे
      प्रौढ तुडतुडे साधारणपणे 2 ते 4 मि.मी. लांब, पाचरीच्या आकाराचे व फिकट हिरव्या रंगाचे असतात. त्यांच्या समोरच्या पंखावर प्रत्येकी एक काळा ठिपका असतो आणि डोक्याच्या भागावर दोन काळे ठिपके असतात. यांची पिल्लेसुध्दा फिकट हिरव्या रंगाचे असून यांना पंख नसतात. तुडतुडयांचे एक वैशिष्टय म्हणजे ते नेहमी तिरके चालतात व चटकन उडी मारतात.
                तुडतुडयाची प्रौढ व पिल्ले पानाच्या मागील बाजूने राहून रस शोषण करतात. त्यामुळे सुरुवातीला पानाच्या कडा पिवळसर पडतात, पाने आकसतात व नंतर कडा तपकिरी किंवा लालसर होतात. प्रादुर्भाव मोठया प्रमाणात असल्यास झाडाची संपूर्ण पाने तपकिरी होतात.



फुलकिडे
      ही कीड अतिशय लहान व नाजूक असून ते 1 मि.मी.पेक्षा कमी लांब असून रंगाने फिकट पिवळसर असतात. सुक्ष्मदर्शक यंत्रातून त्यांची तपासणी केली तर त्यांच्या पंखांच्या कडा केसाळ दिसतात.  यांची पिल्ले सुक्ष्म व बिनपंखी असतात.
                प्रौढ फुलकिडे आणि पिल्ले कपाशीच्या पानामागील भाग खरवडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त भागातील पेश शुष्क होतात.  तो भाग प्रथम पांढुरका आणि नंतर तपकिरी होतो. त्यामुळे पाने व कळया आकसतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने कडक होऊन फाटतात.




पांढरी माशी
                प्रौढ माशी लहान असून साधारणपणे 2 ते 3 मि.मी. असते. पंख पांढरे किंवा करडया रंगाचे असून शरीरावर पिवळसर झाक असते. डोक्यावर मध्येभागी दोन तांबडे ठिपके असतात.
                पांढ­या माशीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करतात. अशी पाने कोमेजतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने लालसर ढिसूळ होऊन शेवटी वाळतात. याशिवाय पिल्ले त्यांच्या शरिरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यामुळे संपूर्ण झाड चिकट व त्यावर बुरशी वाढून काळसर होते. त्याबरोबर काही विषाणूचा प्रसारसुध्दा या माशीमुळे होतो.


मावा
                पूर्ण वाढ झालेला मावा लांबट असून रंगाने पिवळसर ते गडद हिरवा किंवा काळा व 1 ते 2 मि.मी. लांब असतो. मावा शरीराने मृदू असून पोटाच्या मागच्या बाजूस शिंगासारखी दोन टोके असतात.  ही कीड बहुतेक करुन बिनपंखी अवस्थेत आढळतो, परंतु पंख असलेला मावासुध्दा आढळून येतो.
                माव्याची प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने आणि कोवळया शेंडयावर समूहाने राहून त्यातील रस शोषण करतात. अशी पाने आकसतात व मुरगळतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. मावा या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपवस्थेत आणि शेवटच्या अवस्थेत आढळतो.

पिठया ढेकूण
                या किडीचा आकार 4 ते 5 मि.मी. असून त्याचा रंग पांढरट ते पिवळसर असतो.  या किडीची पिल्ले आणि प्रौढ ढेकूण लहान, चपटी व दीर्घ वतुर्ळाकार असतात.  शरीराभोवतीचे मेणासारखे पांढ-या रेशमी कापसासारखे आवरण हळूच बाजूला केले तर पिवळसर रंगाचे ढेकूण दिसतात.
                पिठया ढेकणाची प्रौढ व पिल्ले कपाशीची पाने, कोवळी शेंडे, पाते, फुले व बोंडे यातून रस शोषण करतात. त्यामुळे त्यांची वाढ होत नाही. हे ढेकूण त्यांच्या शरिरातून चिकट द्राव बाहेर टाकतात.  कालांतराने त्यावर बुरशीची वाढ होते व त्याचा झाडावर विपरित परिणाम होतो.  बोंडे फुटल्यानंतर रुईवर बुरशी वाढून प्रत खालावते.

बोंडअळया
ठिपक्याची बोंडअळी
                एरियासा व्हीटेला या जातीच्या पतंगाचे समोरचे पंख फिकट पांढ-या रंगाचे असून त्यावर मध्यभागी हिरव्या रंगाचा पट्टा असतो. तर एरियासा इन्सुलाना या जातीच्या पतंगाचे समोरचे पंख संपूर्ण हिरव्या रंगाचे असतात. पतंग साधारणत: 10 मि.मी. लांब असतात. पूर्ण वाढ झालेल्या अळीची लांबी 18-20 मि.मी. असून रंग गर्द तपकिरी असतो. अळीच्या अंगावर काळे, बदामी ठिपके व बारीक काटे असतात.  शरीराच्या वरच्या बाजूला मधोमध पांढुरका पट्टा असतो. कोषाचा रंग तपकिरी असतो. तर अंडी गोलाकार व निळसर रंगाच्या असतात.
                या किडीची अळी प्रथम झाडाच्या शेंडयात शिरुन आतील भाग खाते, त्यामुळे शेंडे सुकून जातात. पीक फुलावर येताच अळी कळयात शिरुन व नंतर बोंडात शिरुन त्यांचे नुकसान करते. कीड लागलेल्या कळया व बोंडे गळून पडतात. झाडावर राहिलेली बोंडे लवकर फुटतात व त्यापासून कमी प्रतीचा कापूस मिळतो.

हिरवी/ अमेरीकन बोंडअळी
                लहान अळया पारदर्शी, पिवळसर पांढ­या रंगाच्या किंवा हिरवट असतात. मोठी अळी 35 ते 50 मि.मी. लांब, पोपटी किंवा हिरवट रंगाची असून कडेने व पाठीवर तुटक गर्द करडया उभ्या रेषा असतात.  अळीचा रंग लालसर-भुरा किंवा काळसरही असू शकतो. या बोंडअळीचे कोष विटकरी रंगाचे असतात. पतंग मजबूत बांध्याचा असून पुढील पंख गडद तपकिारी रंगाचे असतात. मागील पंख फिकट तपकिरी असून कडा धुरकट असतात.
                अंडयातून बाहेर पडल्यानंतर अळी सुरुवातीस कोवळी पाने, कळया, पाते, फुले यावर उपजिविका करते. बोंडे आल्यानंतर त्यामध्ये तोंड खुपसून आतील भाग खाते. त्यामुळे लहान बोंडे, पात्या, फुले, कळया गळून पडतात किंवा झाडावरच पावसाच्या पाण्यामुळे सडतात.



शेंदरी बोंडअळी
      शेंदरी बोंडअळीची अंडी लांबट पण चपटी असून प्रथम रंगाने मोत्यासारखी चकचकीत पांढरी असतात.  अंडयातून बाहेर आलेली अळी पांढुरकी तर पूर्ण वाढ झालेली अळी शेंदरी रंगाची असते.  पूर्ण वाढ झालेली  अळी 1.5 ते 2.0 सें.मी. लांब असून डोके गडद बदामी रंगाचे असते.  रेशमी आवरणातील कोष 1 सें.मी. लांब असते.  पतंग 1 सें.मी. लांब असून गर्द बदामी रंगाचा असतो व पंखावर बारीक काळे ठिपके असतात.
                अळी कळया, फुले किंवा बोंडे यांना बारीक छिद्र करून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. किडलेली पाते, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न होताच फुटतात.  अळया बोंडामध्ये आत शिरल्यानंतर वरून तिचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही. अळी बियांना छिद्र करून सरकी खाते.  त्यामुळे रुईची प्रत खराब होते आणि सरकीतील तेलाचे प्रमाण कमी होते.


इतर किडी
तांबडे ढेकूण
                प्रौढ गडद लाल असून पोटाच्या बाजूस पांढ­या रंगाचे आडवे पट्टे असतात. याचे डोळे, मिशा व डोक्याजवळ पाठीवरचा भाग काळा असतो. तसेच पुढच्या पंखावर प्रत्येकी एक काळा ठिपका असतो. याची पिल्ले प्रौढासारखीच दिसतात. पण त्यांना पंख नसतात.
                प्रौढ व पिल्ले सुरवातीला पानातील, कोवळया शेंडयातून रस शोषून घेतात. पक्व बोंडावर आणि उमलेल्या बोंडातील रस शोषून घेतात. या किडीच्या विष्ठेमुळे कापसाला पिवळसर डाग पडतात.

करडे ढेकूण
                प्रौढ ढेकूण राखाडी रंगाचा असतो व त्याचे पंख पांढरे पारदर्शक असतात व त्यावर सात काळे ठिपके असतात. पिल्ले सुरुवातीला लालसर तपकिरी असतात व नंतर राखाडी रंगाचे बनतात.
                प्रौढ व पिल्ले अर्धवट उमललेल्या बोंडातील, सरकीतील तेल शोषून घेतात. यंत्रामधून सरकी काढताना ही ढेकणे चिरडून रुईवर डाग पडतात.

पाने गुंडाळणारी अळी
                पतंग मध्यम आकाराचा असून पुढचे पंख फिकट रंगाचे व त्यावर मेणचट अशा तपकिरी नागमोडी रेषा असतात. अळीचा रंग चकचकीत हिरवा असून डोके गर्द रंगाचे असते.
                अळी पानाची गुंडाळी करते. गुंडाळी केलेले पान नरसाळयासारखे दिसते. पानामध्ये लपून राहून कडेकडेने पान खात असते.

करडे सोंडे कीड
                प्रौढ करडया रंगाचा असून पुढच्या पंखावर गडद तपकिरी रंगाचे ठिपके असतात व तोंडाचा भाग सोंडप्रमाणे पुढे आलेला असतो. अळी पांढ­या रंगाची, बिनपायाची व लंबवर्तुळाकार, गुळगुळीत व फिकट पिवळी असतात.
                प्रौढ पानावर, कळीवर, फुलावर व नवीन बोंडावर गोल छिद्र पाडतो. याची अळी रोपाच्या मुळांवर जगते.

तंबाखुवरील पाने खाणारी अळी
                पतंग टणक असून पुढचे पंख तपकिरी रंगाचे असतात व त्यावर गडद चट्टे असतात. तर मागचे पंख पांढरट असतात. पूर्ण वाढ झालेली अळी हिरवट तपकिरी रंगाची, गुळगुळीत असून पाठीवर कडेने काळे त्रिकोणी ठिपके असतात.
                अळी अवस्था ही पानांच्या खालच्या बाजूस राहून सुरुवातीला एकत्रितपणे खात राहते व नंतर एकएकटे राहून दुसरीकडे खात राहते. ही अळी, फुले व कळयावरसुध्दा हल्ला करुन खूपच नुकसान करतात.

लाल कोळी
                कोळयाला आठ पाय असून तो आकाराने माव्यापेक्षा लहान असतो. तो रंगाने लाल असतो.
                पिल्ले व प्रौढ कोळी कोवळया पानातील रस शोषण करतात. त्यामुळे पाने लालसर तपकिरी होतात व नंतर वाळतात.


एकात्मिक कीड व्यवस्थापन
मशागतीय पध्दती
  • कपाशीची शेवटची वेचणी झाल्याबरोबर लगेचच शेतात जनावरे किंवा शेळया, मेंढया चरण्यासाठी सोडाव्यात.
  • कपाशीची धसकटे, पालापाचोळा जमा करुन कंपोष्ट खडयात टाकावा.
  • उन्हाळयामध्ये जमिनीची खोल नांगरणी करावी.
  • कपाशीच्या शेताच्या कडेने पाण्याच्या चारीतील तसेच पडीक जमिनीतील किडींच्या पर्यायी यजमान वनस्पतीचा नायनाट करावा.
  • कपाशीचा खोडवा घेण्याचे टाळावे.
  • कपाशीच्या कुळातील (भेंडी, अंबाडी ) किंवा ज्या पिकावर कपाशीवरील किडी उपजिवीका करतात (टोमॅटो, हरभरा इ.) अशी पिके कपाशी पूर्वी किंवा नंतर घेऊ नयेत.
  • रस शोषण करणा­या तसेच बोंडअळींचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर टाळावा.
  • शिफारसीनुसार दोन ओळीतील व दोन झाडातील अंतर ठेवावे.
  • कपाशीवरील किडींच्या नैसर्गिक शत्रू किटकांचे संवर्धन होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मूग, यासारखी  आंतरपीके / मिश्रपिके  तसेच कपाशी पिकाभोवती  झेंडू आणि एरंडी या सापळा पिकांची एक ओळ कडेने लावावी.
  • आंतरमशागत करुन पीक 8-9 आठवडे तणविरहीत ठेवावे. तसेच ज्या तणावर पिठया ढेकणावर जगणारे परोपजीवी कीटक (प्रोम्युसिडी, अॅनासियस, अॅनागायरस) आढळून येतील अशी तणे काढू नयेत.
यांत्रिक पध्दती
  • प्रादुर्भावग्रस्त व गळालेली पाते / पात्या आणि गळालेली बोंडे जमा करुन नष्ट करावीत.
  • पिठया ढेकणाचे व्यवस्थापन करताना फक्त प्रादुर्भावग्रस्त पिकावर फवारणी करावी अथवा प्रादुर्भावग्रस्त भाग किडीसहीत काढून नष्ट करावा.
  • पिवळया रंगाला पांढ­या माश्या आकर्षित होऊन चिकटतात व मरतात म्हणून पिवळे चिकट सापळे कपाशीचे शेतामध्ये लावावेत.
  • गुलाबी बोंडअळीग्रस्त डोमकळया दिसल्यास त्या तोडून आतील अळीसहीत नष्ट कराव्यात.
  • कामगंध सापळे ४-५ प्रति हेक्टरी लावावे.
  • कपाशीचे शेतात पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी किमान 25 पक्षीथांबे उभे करावेत, म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळया टिपून खातील.

जैविक पध्दती
  • ढालकिडा (लेडी बर्ड बीटल) : या किटकाचे प्रौढ भुंगे व त्यांच्या अळया प्रामुख्याने मावा किडीवर जगतात, म्हणून पिकावर मावा किडीसोबत लेडी बर्ड बीटल पुरेश्या प्रमाणात आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा.
  • गुलाबी बोंडअळीसाठी पीक 120 ते 130 दिवसाचे झाल्यावर ट्रायकोग्रॉमाटॉयडीया बॅक्ट्री या परोपजीवी किटकांचे कार्ड (दीड लाख अंडी प्रति हेक्टरी) पिकावर लावावेत.
  • क्रायसोपा : क्रायसोपाची हेक्टरी 10,000 अंडी या प्रमाणात कपाशीचे शेतात एक सारख्या प्रमाणात, पीक 40 ते 45 दिवसाचे झाल्यानंतर 30 दिवसाच्या अंतराने दोन वेळा सोडावीत, हे मित्र कीटक मावा, तुडतुडे, बोंडअळया (लहान) व अंडी यावर जगतात.  
  • कपाशीवरील किडींचे नैसर्गिक शत्रू कीटक (शेतक­यांचे मित्र कीटक) उदा. सीरफीड माशी, पेंन्टाटोमीड ढेकूण, कातीन, भुंगे, ड्रॅगनफ्लाय (चतूर), रॉबरमाशी, गांधीलमाशी, प्रार्थनाकीटक (मँन्टीड), टॅकनिड माशी ई. चे संवर्धन करावे.
  • वनस्पतीजन्य आणि जैविक किटकनाशकाचा वापर :  5 टक्के निंबोळी अर्काची अथवा अॅझाडिरेक्टीन 10000 पीपीएम 1 मि.ली. प्रति लिटर किंवा 1500 पीपीएम 2.5 मि.ली. प्रति लिटर फवारणी करावी.
  • पिठया ढेकणासाठी व्हर्टिसिलीयम लिकॅनी या बुरशीची 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
  • तंबाखुवरील पाने खाणा­या (स्पोडोप्टेरा) आळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. 500 एल.ई. विषाणू 2 मि.ली. प्रति लिटर पाणी किंवा नोमुरीया रिलाई या बुरशीची 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी प्रादुर्भाव आढळून येताच करावी.


कपाशीवरील किडींच्या व्यवस्थापनासाठी वापरावयाचे कीटकनाशके
किडी
किटकनाशके
मात्रा / 10 लि. पाणी
तुडतुडे फुलकिडे मावा
फ्लोनीकॅमीड 50 डब्ल्युजी किंवा 
2 ग्रॅम
बुप्रोफेझीन 25 एससी किंवा 
20 मिली
डायफेन्थुरॉन 50 डब्ल्युपी किंवा 
12 ग्रॅम
फिप्रोनील 5 एससी किंवा 
30 मिली
अॅसिफेट 75 एसपी किंवा 
8 ग्रॅम
पांढरी माशी
निंबोळी तेल 5 टक्के किंवा
50 मिली
डायफेन्थुरॉन 50 डब्ल्युपी किंवा
12 ग्रॅम
बुप्रोफेझीन 25 एससी किंवा
20 मिली
अॅसिफेट 75 एसपी किंवा
20 ग्रॅम
फ्लोनीकॅमीड 50 डब्ल्युजी किंवा
2 ग्रॅम
पायरीप्रोक्झीफेन 10 ईसी किंवा
10 मिली
स्पायरोमेसिफेन 22.9 एससी
12 मिली
बोंडअळी
(ठिपक्याची बोंडअळी, अमेरिकन बोंडअळी, शेंदरी बोंडअळी)
प्रोफेनोफॉस 50 ईसी किंवा   
30 मिली
थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी किंवा
20 ग्रॅम
इमामेक्टीन बेंन्झोएट 5 एसजी किंवा
4 ग्रॅम
स्पिनोसॅड 45 एससी किंवा
4 मिली
क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एससी किंवा 
3 मिली
फ्ल्युबेन्डामाईड 20 डब्ल्युजी किंवा
5 ग्रॅम
फ्ल्युबेन्डामाईड 39.35 एससी किंवा
2.5 मिली
नोव्हाल्युरॉन 10 ईसी
20 मिली
तंबाखुवरील पाने खाणारी अळी
क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एससी किंवा
3 मिली
नोव्हल्युरॉन 8.8 एससी
20 मिली
डायफ्ल्युबेंझ्युरॉन 25 डब्ल्युपी
6 ग्रॅम
लाल कोळी
डायकोफॉल 18.5 ईसी किंवा
54 मिली
स्पायरोमेसिफेन 22.9 एससी
12 मिली

  • वरील किटकनाशकाची मात्रा साध्या पंपासाठी आहे. पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट करावी.
  • शेतात किटकनाशकांचा वापर करतांना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा.

काय करू नये?
§   पिकाच्या पहिल्या दोन महिन्याच्या काळात रासायनिक किटकनाशकांची फवारणी टाळावी.
§    दुय्यम किडीसाठी फवारणी करु नये.
§   निओनिकोटीनॉईड गटातील किटकनाशकांचा वापर टाळावा.
§  जागतिक आरोग्य संघटना वर्ग 1 मधील कीटकनाशके जसे फॉस्फॅमीडॉन, मिथाईल पॅराथिऑन, मोनोक्रोटोफॉस तसेच निओनिकोडीनॉईड गटातील कीटकनाशके जसे इमीडाक्लोप्रीड, असिटामिप्रीड, थायामिथोक्झाम, क्लोथीनियाडीन इत्यादीचा वापर करु नये.
§   किटकनाशकांची मिश्रणे करुन फवारणी करु नये.
जास्तीच्या नत्र खताचा वापर टाळावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पैसा / वाणू  (मिलिपीड) व्यवस्थापन