गुरुवार, १५ ऑगस्ट, २०२४

 

कपाशीवरील उदयोन्मुख धोका – टोबॅको स्ट्रीक विषाणू (टीएसव्ही)


 

बदलती पीक पध्दती, किडनाशकाचा अति वापर आणि पोषक वातावरण यामुळे फुलकिडीचा कपाशीवर प्रादुर्भाव झपाट्याने वाढलेला आहे. फुलकिड्याच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष नुकसान होते, तसेच 'टोबॅको स्ट्रीक विषाणू' (टीएसव्ही) याचा प्रसार होत आहे. मागच्या वर्षी मराठवड्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आला होता. यावर्षी काही ठिकाणी या विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे आणि सध्यस्थिती यास पोषक आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी कपाशीवरील या विषाणूच्या व्यवस्थापनासाठी तात्काळ उपाययोजना करावी.

 

टोबॅको स्ट्रीक विषाणूच्या (टीएसव्ही) प्रादुर्भावाची लक्षणे

प्रादुर्भावग्रस्त पानावर सुरुवातीला पिवळे डाग किंवा ठिपके दिसतात. नंतर हे डाग पेशीनाश झाल्यामुळे जांभळ्या रंगाचे होतात. पानाच्या देठावर पेशीनाश झाल्यामुळे रेषा तयार होतात. यामुळे झाडाला पाते आणि फुले कमी प्रमाणात लागतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने व पाते वाळून जातात.


 



 

तग धरून जीवंत राहणे आणि प्रसारची पध्दत

हा विषाणू पर्यायी यजमान वनस्पतीवर तग धरून जीवंत राहतात. उदा. गाजरगावत, चाकवत. प्रथम प्रसार प्रादुर्भावग्रस्त झाडापासून होतो. या विषाणूचा प्रसार कपाशीवरील फुलकिडी द्वारे होतो.

 

पोषक घटक

किमान तापमान, जास्त आर्द्रता आणि पानाचा ओळसरपणा हे या विषाणूसाठी पोषक घटक आहेत.

 

फुलकिडे - टोबॅको स्ट्रीक विषाणूचा वाहक

फुलकिडे अतिशय लहान व नाजूक असून ते १ मि.मी.पेक्षा कमी लांब असून रंगाने फिकट पिवळसर किंवा तपकिरी रंगाची असतात. सुक्ष्मदर्शक यंत्रातून त्यांची तपासणी केली तर त्यांच्या पंखांच्या कडा केसाळ दिसतात. यांची पिल्ले सुक्ष्म व बिनपंखी असतात. ही प्रजाती प्रामुख्याने पानाच्या मागच्या बाजूला आढळून येते.

प्रौढ फुलकिडे आणि पिल्ले कापसाच्या पानामागील भाग खरवडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त भागातील पेशी शुष्क होतात व प्रथम तो भाग पांढुरका आणि नंतर तपकिरी होतो. त्यामुळे पाने, फुले व कळया आकसतात, झाडाची वाढ खुटंते. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास पाने व झाड काळपट-तपकिरी दिसतात. फुलकिड्याच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष नुकसान होते, तसेच 'टोबॅको स्ट्रीक विषाणू' याचा प्रसार होत आहे.




एकात्मिक व्यवस्थापन

टोबॅको स्ट्रीक हा विषाणूजन्य रोग असल्यामुळे प्रादुर्भाव झाल्यावर काही करता येत नाही. कपाशीवरील फुलकिडी द्वारे टोबॅको स्ट्रीक विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे या किडीचे व्यवस्थापन केल्यास टोबॅको स्ट्रीक विषाणूचा बंदोबस्त करता येईल. यासाठी खालीलप्रमाणे एकात्मिक व्यवस्थापन करावे.

  •       प्रादुर्भावग्रस्त झाडे काढून नष्ट करावी.
  •     शेतातील तसेच आजूबाजूच्या बांधावरील पर्यायी यजमान वनस्पती (गाजरगावत, चाकवत) यांचा नायनाट करावा.
  •      वेळेवर खुरपणी व कोळपणी करावी. यामुळे तणांचा बंदोबस्त होतो, तसेच फुलकिड्याच्या पिल्लाची शेवटची अवस्था जमिनीत कोषावस्थेप्रमाणे निश्चल राहते. ही अवस्था कोळपणी व खुरपणी केल्यामुळे नष्ट होते.
  •       शिफारशीपेक्षा जास्त नत्रयुक्त रासायनिक खताचा आणि संप्रेरकाचा वापर करू नये.
  •       पिकाचे आणि किडीचे प्रत्यक्ष शेतांना नियमित भेटी देऊन निरीक्षण करावे.
  •      पिवळे व निळे चिकट सापळे : एक हेक्टरसाठी पिवळे (१५) व निळे (५) चिकट सापळे (१.५-१.० फूट आकाराचे) पीक २० दिवसाचे झाल्यावर लावावे.
  •      बीज प्रक्रिया : बीजप्रक्रियेसाठी कपाशीमध्ये इमिडाक्लोप्रीड ४८.०० % एफ़एस ५-९ मिली, इमिडाक्लोप्रीड ७०.०० % डब्ल्युएस ५-१० मिली, थायामिथॉक्झाम ३०.०० % एफएस १० मिली, थायामिथॉक्झाम ७०.०० % डब्ल्युएस ४.३ मिली, कार्बोसल्फ़ान २५.०० % डीएस ५० ग्रॅम प्रति किलो बियाणे या कीटकनाशकांची शिफारस आहे. सध्या बाजारात उपलब्ध जवळपास सर्व बियाण्यास बीजप्रक्रिया केलेली असते. शेतकऱ्यांनी याची खात्री करावी. ज्या बियाण्यास बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांना वरीलपैकी केवळ एकाच कीटकनाशची बीजप्रक्रिया करावी.

फवारणीसाठी कीटकनाशके

कीटकनाशक

प्रमाण / हेक्टर

कीटकनाशक

पाणी (लिटर)

फ़्लोनीकॅमीड ५०.०० % डब्ल्युजी किंवा

१५० मिली

५००

डायनोटेफ़्युरॉन २०.०० % एसजी किंवा

१२५-१५० ग्रॅम

५००

बुप्रोफ़ेझीन २५.०० % एससी किंवा

१००० मिली

५००-७५०

स्पायनेटोरम ११.७ % एससी किंवा

४२० मिली

५००-१०००

टोलफेनपायरॅड १५ % ईसी किंवा

१००० मिली

५००

आयसोसायक्लोसिरम ९.२ % (१० %) डीसी किंवा

०० मिली

५००

फिप्रोनील ५.०० % एससी किंवा

१५००-२००० मिली

५००

फिप्रोनील १८.८७ % एससी किंवा

३७५ मिली

३७५-५००

फिप्रोनील ८०.०० % डब्ल्युजी किंवा

७५ ग्रॅम

३७५-५००

डायफेनथ्यूरॉन ४७.८० % एससी किंवा

५०० मिली

५००

डायफ़ेनथ्युरॉन ५०.०० % डब्ल्युपी   

६०० ग्रॅम

५००-१०००

 

विशेष सूचना

  • पेट्रोल पंपासाठी वरील प्रमाण तीनपट करावे. 
  • फवारणी करताना सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी.
  • एका वेळी एकाच कीटकनाशकाची फवारणी करावी.
  • गरजेनुसार कीटकनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी.
  • कीटकनाशकाची मिश्रणे करू नये. तसेच कीटकनाशकासोबत विद्रव्य खते, संप्रेरके इत्यादी मिसळू नये.
  • फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सामू ५-७ असावा.

 

वरीलप्रमाणे तात्काळ एकात्मिकरीत्या उपाययोजना केल्यास कपाशीवरील उदयोन्मुख धोका असलेल्या टोबॅको स्ट्रीक विषाणूचा बंदोबस्त यशस्वीरीत्या होईल आणि होणारे नुकसान टाळता येईल.

 

 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा