शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

तूर

तुरीवरील प्रमुख किडी
शेंगा पोखरणारी अळी / घाटे अळी
                पतंग शरिराने मजबूत असून पिवळसर तपकिरी रंगाचा असतो. अळी हिरव्या रंगाची असली तरी विविध रंगाच्या अळयाही दृष्टीस पडतात. त्यांच्या शरिरावर बाजुने करडया रंगाच्या तुटक रेषा असतात.
                लहान अळी सुरवातीस तुरीची कोवळी पाने खाते. पिकास फुलोरा लागल्यावर कळया, फुले यावर उपजिविका करते. अळी तिचे अर्धे शरिर बाहेर व अर्धे शेंगेमध्ये खुपसून आतील अपरिपक्व तसेच परिपक्व दाणे खाते.


पिसारी पतंग
                पंतग वाळलेल्या गवतासारखा करडया भु­या रंगाचा असतो. पुढील पंख दुभंगलेले व मागील पंख तीन भागात विभागलेले असून त्यांच्या कडांवर नाजुक केसांची दाट लव असते. त्याचे पाय लांब व बारीक असतात. अळी सुरुवातीला हिरव्या व नंतर तपकिरी रंगाची असते. तिचे शरिर मध्यभागी फुगीर व दोन्ही टोकाकडे निमुळती होत गेलेली असते. तिचे शरिर केस व लहान लहान काटयांनी आच्छादलेले असते.
                पूर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगाचा पृष्ठभाग खरवडून खाते व नंतर शेंगेच्या बाहेर राहून दाणे खाते.
शेंगमाशी
                शेंगमाशी आकाराने फारच लहान, चमकदार काळया रंगाची असते. मादी नरापेक्षा किंचित मोठी असते. अळी बारीक गुळगुळीत व पांढ­या रंगाची असून तिला पाय नसतात. तिचा तोंडाकडील भाग निमुळता असतो.
                अळी शेंगेत शिरुन दाणे अर्धवट कुरतडून खाते, त्यामुळे दाण्याची अडकण/मुकणी/ कळक होते आणि त्यावर वाढणा­या बुरशीमुळे दाणे कुजतात.


शेंग ढेकूण
                प्रौढ ढेकूण हिरवट तपकिरी रंगाचे असतात. त्यांच्या पाठीवर समोरील भागात दोन्ही बाजुस अणकुचीदार काटे असतात. पिल्ले लाल रंगाची असतात. त्यांच्या पायांची पोटरी फुगीर व काटेरी असते.
प्रौढ व पिल्ले पाने, कळया, फुले व नाजुक खोडातील रस शोषण करतात.
ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी
                अळी हिरवट पांढरा रंग असलेली शरीराच्या दोन्ही बाजूस काळे ठिपके असलेली अशी असते. अळी पाने, फुलकळया आणि शेंगा एकत्र करून त्या गुच्छ तयार करते व त्यात लपून बसते व उदरनिर्वाह करते.


पाने गुंडाळणारी अळी
                पतंग पतकिरी रंगाचा असून अळी पिवळसर रंगाची असते. अळी कोवळे देठ आणि पाने गुंडाळून आत राहते व उदरनिर्वाह करते.


एकात्मिक कीड व्यवस्थापन
मशागतीय पध्दती
  • घाटेअळीचे कोष नष्ट करण्यासाठी उन्हाळयात जमिनीची खोल नांगरट करावी.
  • शिफारस केलेल्या वाणाचीच योग्य अंतरावर पेरणी करावी.
  • ज्यावेळी तुरीची सलग पेरणी केली जाते त्यावेळेस बियाण्यात 1 टक्का ज्वारी अथवा बाजरीचे बी मिसळून पेरणी करावी.  तुरीबरोबर ज्वारी, बाजरी, मका अथवा सोयाबीन ही आंतरपिके घ्यावीत.
  • क्षेत्रिय (झोनल) पेरणी पध्दतीचा अवलंब करावा. संपूर्ण गावामध्ये एकाचवेळी पेरणी करावी.
  • वेळेवर आंतरमशागत करून पीक तण विरहित ठेवावे.

यांत्रिक पध्दती
  • पाने गुंडाळणा­या अळीची प्रादुर्भावग्रस्त पाने गोळा करून अळीसहीत नष्ट करावीत.
  • शेताच्या बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरणा­या अळीची पर्यायी खाद्यतणे उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी ही तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत.
  • पुर्ण वाढ झालेल्या अळया वेचून त्यांचा नाश करावा.
  • पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी 50 ते 60 पक्षी थांबे शेतात लावावेत, जेणे करून त्यावर बसणारे पक्षी शेतातील अळया वेचून खातील.
  • शेंगा पोखरणा­या हिरव्या अळीसाठी पीक कळी अवस्थेत आल्यापासून हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावेत जेणे करून किडीची आर्थिक नुकसानीची पातळी कळेल.
  • तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे आणि पोत्यावर पडलेल्या अळया वेळोवेळी गोळा करून नष्ट कराव्यात.

जैविक पध्दती
  • पीक कळी अवस्थेत असताना निंबोळी अर्क 5 टक्केची फवारणी करावी.
  • पीक 50 टक्के फुलो्ययात असताना मेटॅरीझीयम अॅनिसोप्ली हे बुरशीयुक्त कीडनाशक 2 ते 3 मि.ली. व राणीपाल (0.01 टक्के  द्रावण ) 1 मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • शेंगा पोखरणारी हिरवी अळी लहान अवस्थेत असताना एच. ए. एन. पी. व्ही. विषाणुची 250 एल. ई. प्रति हेक्टर प्रमाणे फवारणी सायंकाळी करावी.

रासायनिक पध्दती
रासायनिक किटकनाशकांची फवारणी पट्टा पध्दतीने अथवा खंड पध्दतीने केल्यास परोपजीवी किडीच्या संवर्धनात मदत होते.
किडींच्या प्रादुर्भावानुसार खालील किटकनाशकाची फवारणी करावी.



कीड               कीटकनाशक                     प्रमाण प्रति 10 लिटर पाणी
शेंगा पोखरणा­या किडी
(शेंगा पोखरणारी अळी पिसारी पतंग, शेंगमाशी)
ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी
                    क्विनलफॉस 25 ईसी किंवा                28 मिली
                            इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी किंवा        4.5 ग्रॅम
                            स्पिनोसॅड 45 एससी  किंवा               3 मिली
                            क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 टक्के किंवा        3 मिली
                            फ्ल्युबेन्डामाईड 39.35 एससी किंवा         2 मिली
                            बेनफ्युराकार्ब 40 टक्के किंवा              50 मिली
                            इंडोक्झाकार्ब 14.5 एससी किंवा             8 मिली
                            इंडोक्झाकार्ब 15.8 एससी किंवा             7 मिली
                            ल्युफेन्युरॉन 5.4 टक्के किंवा               12 मिली
शेंगमाशी            डायमेथोएट 30 टक्के किंवा                 10 मिली
                            मोनोक्रोटोफॉस 36 टक्के                  11 मिली
शेंग ढेकूण          डायमेथोएट 30 टक्के                      10 मिली

 वरील मात्रा साध्या पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी.

*****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पैसा / वाणू  (मिलिपीड) व्यवस्थापन